या कारणांचा विचार करताना त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर काही गुणांचा विचार करावा लागेल ,अभिमान, स्वाभिमान,अहंकार.
लाचारी(स्वीकृत आणि अंगभूत)हे गुण मानवी अमूर्त स्वभावाची अमूर्त विशेषणं आहेत मग अभिमान कोणताही,उदा.देशाभिमान, धर्माभिमान वगैरे!स्वाभिमान व्यक्तिकेंद्री विशेषण आहे.स्वत:च्या सद्गुणांचा अभिमान म्हणजे स्वाभिमान!आणि दुर्गुणांचा अभिमान म्हणजे अहंकार!!अहं म्हणजे सर्व मीच अहंगंडाचे व्यक्त रूप म्हणजे नअहंकार आणि न्यूनगंडाचे व्यक्तरूप म्हणजे लाचारी!
अर्धवट ज्ञानी अहंकारी असतो म्हणजेच दुर्गुणी असतो. हल्ली अशांचं फार पेव फुटलेलं आढळतं!असाच एक दुर्गुणी अर्धवट ज्ञानी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सांगू लागला एखाद्या आस्थापनेमध्ये प्रत्येक वेतन श्रेणीत स्वतंत्र रोष्टर असते.ज्ञानी असलेले कर्मचारी निमूटपणे समजत असूनही ऐकून घेत होते. ज्ञानाचा लवलेश पात्रता नसताना कांहीं माणसांना वैभव प्राप्त झालं की प्राप्त वैभव औकातीपेक्षा जास्त मिळाल्याने सत्ता, अधिकाराच्या अहंकाराने ग्रासल्याने साधे साधे वर्तनज्ञान त्याला नसते.असलेल्या सत्ता,अधिकाराचा वापर करताना त्याला योग्यायोग्य समजत नाही.सत्ता असल्याने त्याच्या अधिपत्या खालील त्याचे पोसलेले चाटूकार त्याच्या मूर्खपणाला देखील दुजोरा देतात.काही जण ज्ञानी असलेले वैयक्तिक नुकसान होईल म्हणून नाईलाजाने गप्प बसतात प्रत्युत्तर देत नाहीत त्यामुळे त्याचा अहंकार उत्तरोत्तर वाढतच जातो.अहंकारामुळे बुद्धीनाश होतो.रामायण महाभारतातील खलनायकाच्या किंवा अगदी सांप्रत परिस्थितीतील अल्पसा अधिकार
सत्ता असलेल्यांची हीच स्थिती आहे.सत्तेच्या झापडीमुळे अहंकार वाढतो त्यामुळे त्याचे मनोधैर्य वाढते.तसं तसं तो जास्तच मूर्खपणा करून स्वत:ची फजिती करून घेतो.अधिकाराखालील व्यक्तिना त्याचा मूर्खपणा ऐकून घेणं अपरिहार्य असते.बालिश बहू बायकात बडबडला या मोरोपंतांच्या ओळी प्रमाणे त्याचे बोलणे असते अर्धवट ज्ञानी अहंकार कधीच सोडत नाही त्यातच त्याचे पतन होते.
अज्ञान्याला लाचारीचे काही वाटत नाही.लाचारी स्वाभिमान काय असतो हे त्याला समजतच नाही.आणि समजलंच तर ती त्याची जीवन जगण्यासाठी गरज असते.असमर्थता, न्यूनगंडाचे प्रकटी करण म्हणजे लाचारी!ती त्यांच्या स्वभावाचे अविभाज्य अंग असते.त्याला आणि इतर कोणालाही त्याचं काय वाटत नाही किंबहुना जीवन हे असच जगायचं असतं हे तो इतरांनाही अज्ञानामुळे सांगतो.स्वाभिमानाचा लवलेशही त्याला नसतो.आता पूर्ण ज्ञानी स्वाभिमानी असतोच.पण कधी कधी जाणीव पूर्वक अहंकारी बनतो पूर्ण ज्ञान्याचा अहंकार परिस्थिती सापेक्ष असतो.स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी त्याला अहंकार स्वीकारावा लागतो.स्वाभिमानी कधी कधी लाचार सुद्धा जाणीवपूर्वक होतो.
प्रश्न असे निर्माण होतात की,स्वाभिमानी अहंकारी झाला तर वावगे ठरू नये पण स्वाभिमानी लाचार का होतो? त्यांच्या लाचारीस कोणते घटक कारणीभूत ठरतात?का सतांध राक्षसांना स्वाभिमान्याला लाचार बनवण्यात राक्षसी आनंद मिळतो?का स्वाभिमानी,स्वत: परिस्थिती शरण होऊन नाईलाजाने सत्तांध उन्मत्त, राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या मदांध व्यक्तीच्या इच्छे खातर लाचार होतो?का स्वत:च्या, कुटुंबाच्या भल्यासाठी क्षणिक फायद्यासाठी लाचारी स्वीकारतो ? बहुधा हे असंच असावं!पूर्ण ज्ञानी स्वाभिमानी असतो हे जर मान्य केले तर मग ज्ञानी मनुष्य स्वाभिमान सोडून लाचारी का पत्करतो?
उत्तर:-सत्ता अधिकार सत्ताधाऱ्याची दमदाटी,वरिष्ठ अधिकाऱ्यांची सत्तांध,उर्मट भाषा सहन करतो किंवा स्वत:ची,मानसिकशारीरिक दुर्बलता झाकण्याचा साठी कुटुंबाच्या कल्याणासाठी,हितासाठी दोन पावले मागे सरकून परिस्थितीशी तडजोड करतो,स्वत:चा आत्मसन्मान काही काळासाठी बाजूला ठेवून जीवनात तडजोड करावीच लागते या न्यायाने त्याचे वर्तन असते.कांहीं काळासाठी लाचारी समजून उमजून स्विकारतो.ही जाणीवपूर्वक स्वीकारलेली लाचारी म्हणजे स्वीकृत लाचारी होय.विशेष म्हणजे समाजाला इतरांना त्याचे काही वाटत नाही कारण सद्य परिस्थितीत लाचारी स्वीकारणे यात वावगं काहीच नाही. ती आजच्या काळाची अपरिहार्यता आहे,याची जाणीव सर्वांना आहे.पण जो पूर्ण ज्ञानी स्वाभिमानी आहे त्याला त्याचे मन त्याला साक्ष देत नाही.मनात झुरतो!परिस्थितीशी केलेली तडजोड म्हणजे शरणांगती नाही जीवन जगण्यासाठी आवश्यकता आहे.हे समजून शांत असतो.हे
त्याचे वर्तन कुटुंब,समाज किंवा जीवनातील यशस्वीतेच्या ज्या कल्पना आहेत त्याला अनुसरून योग्य ठरते.विशेषतः पांढरपेशी चाकरमान्यांच्या बाबतीत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. नोकरीत बढती उच्चवेतनश्रेणी,बदली,रजा वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती,या सहजासहजी चाकरमान्यांच्या बाबतीत असणाऱ्या हक्काच्या बाबतीत नतदृष्ट आणि सरंजामी मनोवृत्तीचे अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात आणखी मुद्दा असा आहे की,ही व्यवस्थाच अशी बनवली गेली आहे की, सर्वांना हात टेकायला भाग पाडते.स्वाभिमानी माणूस व्यवस्थेला शरण जाऊन लाचारी स्विकारतो.पांढरपेशी चाकरमान्यांना त्यांच्या हक्काची माहिती असते,अधिकाऱ्यांनं वेठीस धरलेलं असल्यामुळे संघर्ष नको म्हणून तडजोड करतों,लाचारी स्वीकारतो क्षण एक पुरे लाचारीचा वर्षाव घडो आनंदाचा||अशा सर्व प्रकारे स्वीकारलेली लाचारी ही स्वीकृत लाचारी होय.
आता अंगभूत लाचारीचा विचार करू!कांही जणांचा स्व-भावच असा असतो की, जीवनात स्वाभिमान,स्वयं कर्तृत्व कांहीं तरी करण्याची उमेद,आत्मभान आत्मविश्वास या गोष्टीचा त्यांच्याकडे लवलेशही नसतो.स्वत:च्या क्षणिक फायद्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात.त्यांचं जीवन सुखी असतं हे मात्र खरं!कारण हे कोठे ही गेले तरी त्यांची लाचारी, चमचेगिरी चापलूसगिरी,चाटूकारिताही सोबतच असते त्यामुळे त्यांना कुठे काही कमी पडतच नाही अशांची समाजाच्या लेखी त्यांची किंमत शून्य असते पण त्याचं त्यांना काही वाटत नाही.निर्लज्जंम् सदा सुखी!या न्यायाने त्याचे जगणे असते.
