‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय
लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक ८ व ९ जून रोजी सोलापूर येथे हिराचंद नेमचंद कार्यालयात शालिनीताई ओक विचारमंचावर अत्यंत उत्साहात संपन्न झाली. बैठकीसाठी राज्यभरातून १७५ अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये १९ जिल्ह्यातून जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन दिवसाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले.
१) नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या निकालाबाबत मुंबई हायकोर्टात अपील करणे. निकालाचा मराठी अनुवाद करून तो लोकांच्या पर्यंत पोहोचवणे.
२) ‘नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ हे अभियान २० जून ते २० ऑगस्ट २०२४ या दरम्यान सुरू करणे. यामध्ये डॉ. दाभोलकरांच्या 15 पुस्तिका प्रकाशित करून त्याच्या साठ हजार प्रती वितरीत करणे.
३) आंतरजातीय जातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर सूचक केंद्र सुरू करणे.
४) धार्मिक स्थळावर दैवी उपचार घेणाऱ्या मानसिक रोग्यांसाठी ‘दवा आणि दुवा प्रकल्प’ सुरू करणे.
५) सन २०२४ हे वर्ष ‘प.रा.आर्डे प्रबोधन प्रशिक्षण वर्ष’ जाहीर करून पुढील सहा महिन्यात प्रामुख्याने सोलापूर,सांगली,पुणे, रत्नागिरी, खेड या ठिकाणी दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजन करणे. तसेच मुंबई, बीड, अहमदनगर, पालघर, धाराशीव, रत्नागिरी या जिल्ह्यात शिक्षक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.
६) सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे.
उद्घाटन, विशेष अंक प्रकाशन:
शनिवारी ८ जून रोजी सकाळी दहा वाजता माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांका’ चे प्रकाशन करून बैठकीचे उद्घाटन झाले.
अहवाल सादरीकरण
त्यानंतर डॉ. हमीद दाभोलकर आणि राहुल थोरात यांनी गेल्या सहा महिन्यात राज्यात झालेल्या कामाचा अहवाल सादर केला. त्यानंतरच्या दोन सत्रात महाराष्ट्रातील राज्यभरातून आलेल्या जिल्हा कार्याध्यक्षांनी/ सचिवांनी आपल्या जिल्ह्याचा कार्य अहवाल राज्य कार्यकारणी समोर सादर केला.
निकालाचा अन्वयार्थ :
सायंकाळी पाच वाजता ‘डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालाचा अन्वयार्थ’ यावर मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, फारुख गवंडी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या निकाल पत्रामध्ये मा.न्यायमूर्तींनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. ती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
देणगीदारांचा सन्मान
सायंकाळी सहा वाजता सोलापूर शहरातील अंनिसच्या देणगीदारांचा आणि जाहिरातदारांचा सन्मान ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अंनिस मध्ये विशेष काम करणाऱ्या रमेश माने, शंकर कणसे,नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, भगवान रणदिवे, गीता हसूरकर या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष व्याख्यान:
सायंकाळी सात वाजता मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद यांचे ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण झाले.
रात्री नऊ वाजता अंनिस कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
निर्भय मॉर्निंग वॉक:
दुसऱ्या दिवशी रविवारी ९ जून रोजी सकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद कार्यालय पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत कार्यकर्त्यांनी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढला. निर्भय मॉर्निंग वॉकच्या वेळी कार्यकर्त्यांनी चळवळीची गाणी आणि घोषणा दिल्या.
विभागवार आढावा :
रविवारी दिवसभर संघटना बांधणी विभाग, प्रशिक्षण विभाग, सोशल मीडिया विभाग, प्रकाशन विभाग, युवा आणि महिला विभाग, आंतरजातीय सहाय्य विभाग आणि मानसिक आरोग्य विभाग या विभागांच्या कामांचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामांचे नियोजन केले गेले.
समारोप:
राज्य कार्यकारणी बैठकीचा समारोप रविवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध सर्जन व डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे वर्गमित्र डॉ. बी.वाय. यादव (अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी) यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद, ग्रामीण कथाकार डॉ.अर्जुन व्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी डॉ. यादव यांनी डॉ. दाभोळकर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, डॉ. दाभोलकर यांनी विद्यार्थीदशेत मिरज मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन उभे करून २६ दिवस संप घडवून आणून मिरज मेडिकल कॉलेजला मान्यता मिळवून दिली. या त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना विद्यार्थी होस्टेलमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी लागली होती.
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद म्हणाले की,अंधश्रद्धेच्या गर्तेत लोक स्वतःला अडकवून घेऊन स्वतःवर दुःख ओढवून घेतात.अंधश्रद्धेमध्ये गरीब लोक अडकले आहेत. त्यांची फसवणूक होतेय हे त्यांच्या लक्षात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. जात ही मोठी अंधश्रद्धा आहे, रोटी बेटी व्यवहार आपण सुरू केले शिवाय जाती निर्मूलन होणार नाही. अंनिसने या कामी पुढाकार घ्यावा.
‘हम होंगे कामयाब एक दिन’ या गीताने बैठकीची सांगता झाली.
प्रमुख उपस्थिती :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, प्रा. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रशांत पोतदार,फारुख गवंडी, प्रकाश घादगिने, निळकंठ जिरगे उपस्थित होते.
उत्कृष्ट संयोजन
दोन दिवसाच्या या राज्य कार्यकारणी बैठकीचे उत्कृष्ट संयोजन सोलापूर जिल्हा अंनिसच्या कार्यकर्त्या उषा शहा, मधुरा सलवारु, अंजली नानल, निशा भोसले, अस्मिता बालगावकर, ब्रह्मानंद धडके, हेमंत शिंदे, विनायक माळी यांनी केले.
