स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन वाहनांसह दोन आरोपींविरुद्ध दोन गुन्हे दाखल
लातूर, शहर प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत ९ लाख ३८ हजार ७९४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसेच दोन वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर विशेष मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला १८ ऑक्टोबर रोजी माहिती मिळाली की, काही व्यक्ती महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ वाहतुकीद्वारे विक्रीसाठी नेत आहेत.या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी उदगीर ग्रामीण व वाढवणा हद्दीत सापळा लावून कारवाई केली. यात एकूण ४ लाख १८ हजार ७९६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा आणि ५ लाख २० हजार रुपयांची दोन वाहने असा एकूण ९ लाख ३८ हजार ७९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी खालील दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमजद निजामुद्दीन बिद्रे (३७, रा. कुमठा, ता. अहमदपूर), परमेश्वर काशिनाथ वसमते (३६, रा. आवलकोंडा, ता. उदगीर) दोघांविरुद्ध अनुक्रमे उदगीर ग्रामीण व वाढवणा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, अर्जुन रजपूत, मनोज खोसे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड व तुळशीराम बुरुरे यांनी केली.




