लातूर प्रतिनिधी : अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोल नाक्यापासून सुमारे 1 किमी अंतरावर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास घडली.
नायगावकडून लातूरकडे जोरात येणाऱ्या एमएच-26 सीई 1193 या कारने कोकळेगाव (ता. नायगाव) येथे जाणाऱ्या दुचाकीला समोरून जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारने दुचाकीला काही अंतर फरफटत नेले. पुढे ओढ्याच्या कठड्याला अडकल्याने कार थांबली.
या अपघातात माधव गुलाब लोहगावे (वय 24) आणि संतोष संभाजी चिंतले (वय 20, दोघेही रा. कोकळेगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही पुणे येथे कामानिमित्त राहत होते आणि गावाकडे येत असताना ही दुर्घटना घडली.
घटनास्थळावरील नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस पथक उशिरा घटनास्थळी पोहोचले. मयतांचे हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले असून, कार ही नायगाव येथील असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



