जिल्हा सक्षमीकरण कार्यालयाचे उदघाटन
लातूर – दिव्यांग सामाजिक न्याय विभागाची स्थापना १९३२ साली झाली या अंतर्गत समाज कल्याण विभाग कार्यरत होता. यातूनच आजपर्यंत दिव्यांगांच्या विविध योजना राबविल्या जात होत्या, आता स्वतंत्र दिव्यांग विभाग झाल्याने दिव्यांग सक्षमीकरणाला गती मिळेल असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी गुरुवारी केले. गूळ मार्केट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. मंचावर सहाय्यक संचालक वित्त व लेखा अधिकारी प्रभाकर डाके, प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात पडताळणी अधिकारी राम वंगाटे, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रादेशिक उपायुक्त देवसटवार म्हणाले दिव्यांगाचा स्वतंत्र विभाग होणे ही काळाची गरज होती. दिव्यांगत्वाचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे या विभागाला मनुष्यबळाची गरज भासेल. लातूर विभागात चार जिल्हयात दिव्यांगाच्या १८० शाळा असून १०,००० विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत. अधिक अधिक दिव्यांग विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत आणने गरजेचे असून त्यांना स्वावलंबी बनविणे हा उद्देश समोर ठेवणे गरजेचे आहे. या वेळी संशोधन अधिकारी राम वंगाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते फित कापून नुतन जिल्हा सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड यांनी प्रास्तविकात स्वतंत्र दिव्यांग विभाग झाल्याने दिव्यांगांच्या अडी-अडचणी लवकरात लवकर सोडविण्यास मदत मिळेल असे सांगून शासनाच्या वतीने या विभागाला न्याय देण्यात आला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन बहूउद्देशिय शिक्षण संस्थेचे सचिव आण्णासाहेब कदम, रामनारायण भुतडा, महेश पाळणे, विजय बुरांडे, हरिश्चंद्र बेंबडे, ज्ञानेश्वर राव, अमोल निलंगेकर, गणेश पाटील, बालाजी शिंदे यांच्यासह दिव्यांग शाळेतील मुख्याद्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन शिवाजी गायकवाड चिखलीकर यांनी केले तर आभार वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता तुकाराम धुमाळे यांनी केले.
१०० दिवसांच्या कृति आराखड्यातून विभागाची निर्मिती ….
राज्य शासनाच्या १०० दिवसाच्या कृति आराखडयाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून लातूर जिल्ह्यात १ मे महाराष्ट्र दिनी हे कार्यालय स्वतंत्रपणे सुरु झाले आहे.
