23.9 C
New York
Monday, July 7, 2025

समाधान! कौटुंबिक सौहार्द्राचे भाग-२

या लेखमालेच्या पहिल्या भागात मी कौटुंबिक सौहार्द्राची प्रस्तावना थोडक्यात केली तसं पाहिलं तर या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. पैलूही अनेक आहेत.सगळेच पैलू नकारात्मक असतात असे नाही पण भौतिक विकास झाला पण माणसांची
अगदी जवळच्या नात्यातील, कुटुंबातील माणसांची मन मात्र आक्रसली त्याबाबत हे आणखी विवेचन!
या लेख मालिकेच्या पहिल्या भागात छोट्या कुटुंबातील दोन मुलं आणि पत्नी हे सर्वात जवळचे म्हणून गृहित धरून विश्लेषण केले आहे. कुटुंब म्हटल्यावर आपले आई वडील भाऊ बहिणी आणि नातलग यांचाही सामावेश होतो. नातलग जरी कधीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतील तरी सुद्धा त्यांचा संबंध येतोच आणि ताणतणावाचे प्रसंग येतात. मग आता या संबंधात सौहार्द्र कसे टिकवायचे हा एक यक्ष प्रश्न निर्माण होतो.
प्रत्येक माणसाच्या वाट्याला कुटुंबातील,नात्यातील कोणत्या ना
कोणत्या माणसांच्या अनुषंगाने,प्रसंगाने विविध विषयाच्या अनुषंगाने आयुष्यात कधी तरी असा प्रसंग येतोच. त्याचं स्वरुप
तीव्रता दाहकता आणि एकंदरीत परिणामकारकता कमी अधिक असू शकते पण भोगावं लागतं हे मात्र नक्की!त्याची परिणाम कारकता ही माणसांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते.
किती मनावर घ्यायचे हा सोशिकतेचा भाग असतो.
मुलगा,सून याच्यामुळं आणि काही प्रमाणात मुलगी जावई याच्यामुळं असे प्रसंग निर्माण होतात.
नटसम्राट नाटकातील प्रसंग जरी काल्पनिक असला तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.कारण प्रतिभावंत लेखक,कवी,नाटककार यांच्याअति संवेदनशील मनानं अनुभवजन्य वास्तव चित्रित केलेलं असतं.
नटसम्राट!!एके काळी आपल्या अभिनयाने संपूर्ण मानवी मनावर अधिराज्य करणाऱ्या गणपतराव बेलवलकरांवर त्यांच्या स्वतःच्या मुलीने चोरीचा खोटा आळ घेतानाचा तिचा आवेश कुठून जन्मास आला?माझी चिमणी,माझी चिमणी म्हणून तिचं अंगाखांद्यावर केलेलं संगोपन,कोडकौतुक लाड हेच त्या आवेशाच्या जन्मास कारणीभूत आहेत का? याचा विचार सौहार्द्राच्या अनुषंगाने प्रत्येकाने करायला हवा.असा प्रसंग संवेदनशील मनाला खूप काही शिकवून जातो. गणपतराव आणि त्यांच्या पत्नीचा करारीपणा जो वि.वा.शिरवाडकरांनी रेखाटला आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. दोघांनी रस्त्यावर मरण पत्करलं पण शरण नाही गेले. हा करारीपणा अंगी बाळगावा अशी शिकवण शिरवाडकर यच्ययावत मानव समाजाला देतात.
प्रत्येक व्यक्तीनं कौटुंबिक सौहार्द्र टिकवायचं कशासाठी?
आपण जीवन जगतोच मुळी आनंदासाठी.ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी! आयुष्यभर माणसं ढोरमेहनत करतात. निसर्ग नियमानुसार मुलं होतात.मुलांच्या करिअरचं भूत मानगुटीवर घेऊन जगत असतात.आणि इथंच चूक होते.मुलांचं करिअर बनलं, लग्नं झाली नातवंडे झाली.आता आनंद मिळेल म्हणून आसुसलेले असतात.पण वाट्याला वेगळंच येतं.सून नातवंडांना हात सुद्धा लावू देत नाही.इन्फेक्शन होईल म्हणून दूर रहायला सांगते!मिळाला का आनंद!!!
मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे अवास्तव अपेक्षा हेच दु:खाचं
मूळ आहे.मुलं मोठी होतील,मला हवं नको ते बघतील,माझा आदर सन्मान ठेवतील,माझ्या आज्ञेत राहतील या मोठ्या अपेक्षा तर सोडा.जेवायला देतील झोपायला जागा देतील या अपेक्षा न
ठेवता आपल्याला सर्वात वाईट प्रसंग येणार आहे म्हणून प्लॅन बी
तयार ठेवा.अगदी घराबाहेर काढलं, वृद्धाश्रमात जायची पाळी आली हे आणि असे प्रसंग येणार,(सुदैवाने कोणावरही येऊ नयेत)
पण आलेच तर कणखरपणे सामोरे जाऊन प्लॅन बी अंमलात आणावा!
आणखी एक मुद्दा नामुष्कीचा! नामुष्की वगैरे हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत.नामुष्की ओढवल्याने जे कोणी आपल्याला हिणवणारे आहेत त्यांच्या वाट्याला सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारची नामुष्की आलेली असते,येणार असते म्हणून फारसं मनावर घेण्याची गरज नाही कारण अशा नामुष्कीचं आता सामान्यी करण झालेलं आहे.
माणसं,वृद्धपणात आपलं कसं होईल?आपल्याला आधार कोण देईल?या विचाराने तडजोड करत असतात.अशी तडजोड म्हणजे शरणांगती पत्करणे होय.सर्वसाक्षी परमेश्वराने आपल्याला जीव दिलेला आहे तो जीव देहात असेपर्यंत त्या देहात क्रयशक्ती असते असा आत्मविश्वास बाळगायला हवा!हतबल होता कामा नये! कसाही प्रसंग आला तरी त्याच्याशी दोन हात करण्याची धमक बाळगली पाहिजे! त्यामुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रता जाणवत नाही!आणि ही धमक आहे हे कळल्यावर बायकामुलं सुद्धा सुतासारखे सरळ वागतात.
सर्वांचं सरळ वागणं म्हणजेच कौटुंबिक सौहार्द्र होय!

           – कुलकर्णी सर मातोळकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles