अहमदपूर : दलितमित्र, शिक्षण महर्षी, हाडाचे शिक्षक, शिस्तप्रिय प्रशासक, आदर्श संस्थाचालक डी. बी. लोहारे गुरुजी यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला हा धावता प्रकाश, शिक्षण महर्षी डी. बी. अर्थात धुंडीराज भुजंगराव लोहारे गुरुजी यांचे शिक्षण क्षेत्रातील, समाज क्षेत्रातील कार्य अथांग महासागरासारखे आहे. लोहारे गुरुजीचा जन्म १२ फेब्रुवारी १९३४ रोजी चिखलात कमळ फुलावे या उक्तीप्रमाणे अहमदपूर तालुक्यातील मुळकी – उबंरगा येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या एका शेतकरी कुटुंबात झाला.
अगदी लहान वयातच वडिलांचे छत्र हरवलं. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची अत्यंत दयनीय अवस्था झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षषण अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे मामाच्या गावी झाले. गुरुजी आपल्या आईला सर्वस्वी मानून आईच्या आज्ञेनुसार वागत. गुरुजींच्या आईचे नाव गंगाबाई तर वडिलांचे नाव भुजंगराव असे होते. आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही या उक्तीप्रमणे दररोज आईचे राम प्रहारी दर्शन, आर्शिवाद घेऊनच गुरुर्जीची दैनंदिनी सुरु होत असे.
हैदराबाद मुक्ती लढ्यातील प्रमुख सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, मुक्तीलढ्यातील प्रमुख कार्यकर्ते गोविंदभाई श्रॉफ, राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा अनमोल सहवास लाभल्यामुळे त्यांच्या विचारात बदल झाला. समाजसेवेचा, शिक्षण चळवळीचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे त्यांचे सामाजिक विचार प्रगल्भ झाले आणि अनेक संस्कारक्षम मित्र जोडले गेले. शिक्षण व समाजसेवेचा वसा घेऊन गुरुजीनी आपल्या शैक्षणिक कार्याचा श्री गणेशा आपल्या जन्मभूमीत केला.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नांदेड येथील शिक्षण संस्थेत काम करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे अहमदपूर तालुक्यातील मुळकी उबंरगा येथे ग्रामीण भागातील गोरगरीब, दीनदलित, पीडित, शेतकरी, मुलामुलींना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी १९६२ साली शांतिनिकेतन विद्यालयाची स्थापना केली.
ग्रामीण भागामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाची उभारणी राष्ट्रसंत प पू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने केली आणि ज्ञानगंगेचे तोरण बांधले. त्यानंतर तालुक्यातील कुमठा येथील सरस्वती विद्यालय, रोकडा सावरगाव येथील बापुजी विद्यालय, धनेगाव येथील महादेव विद्यालय, कबन सांगवी येथील महात्मा फुले विद्यालय, घामनगांव येथील संत भगवान बाबा विद्यालय, येस्तार येथील साने गुरूजी विद्यालय, मुरढव येथील पद्मावती विद्यालय, अहमदपूर शहरातील यशवंत बालवाडी, यशवंत प्राथमिक विद्यालय, यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यशवंत तांत्रिक विद्यालय, आणि डॉ. एस एस एम प्रतिष्ठानचे यशवंत अध्यापक महाविद्यालयाच्या गुरुजींनी सुसज्जं इमारती’ व मैदानासह शाळा स्थापन करून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा यज्ञ चालू करून यामध्ये शेकडो हजारो विद्यार्थी घडलेले आहेत.
महात्मा गांधी यांच्या उक्ती प्रमाणे लोहारे, गुरुजी म्हणत की, जोपर्यंत खेडयांचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. हा मंत्र ध्यानी घरुन गुरुजींनी सर्व शाळा विशेष करून ग्रामीण भागात चालू केल्या. या मुळे शेतक-यांच्या, शेतमजुरांच्या, दीनदलितांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडी झाली.
मुळकी उंबरगा हे गाव डोंगराळ भागात वसलेले आहे या गावात आजूबाजूच्या परिसरात शिक्षणाची कोणत्याही प्रकारच सोयीसुविधा नव्हती. म्हणून लोहारे गुरुजींनी गोरगरीब दिंनदलित मुलांच्या शिक्षणासाठी मुळकी उबंरगा येथे पहिल्या आदर्श वस्तीग्रहाचे मुरत मेड रोवली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि अडचणीतून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वास्तव्यास व खर्चाच्या सुविधा अभावी प्राथमिक शिक्षणापासून दूर राहावे लागत असे जातीय व्यवस्थेच्या पगडामुळे दलितांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अडचण दूर करून अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मागासवर्गीय मुलांसाठी वस्तीगृहाची स्थापना केली.
शासनाने राज्यपातळीवरील दलित मित्र पुरस्कार १९९५ साली त्यांना बहाल केला. सोबतच शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार १९९८ साली त्यांच्या कार्याकडे पाहून प्रदान केला.
शाळा स्थापनेपासून यशवंत विद्यालयाचा निकाल प्रतिवर्षी यशाच्या चढता आलेख असून सरासरी निकाल ९९% असतो आणि दरवर्षी साधारणतः दहा मुलं १००% चे असतात हे विशेष होय.
शैक्षणिक क्षेत्रासोबत क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यशवंत विद्यालयाच्या क्रीडा विभागाने अटकेपार झेंडा लावलेला असून शाळेचा साईप्रसाद जंगवाड हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तलवारबाजी मध्ये त्यांनी कामगिरी करून देशाचे नेतृत्व केले आहे.
शाळेला खादीचा शंभर टक्के गणवेश, गीताई वाचन, माता पिता पालक योजना महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक ठरली आहे.
आज ९१ व्या वर्षीसुद्धा गुरुजी जातीने. शालेय व्यवस्थापनामध्ये विशेष लक्ष देत असून त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या प्रा. डॉ. सुनिताताई चवळे लोहारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, मातोश्री पुष्पाताई लोहारे, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, सेवानिवृत्त अभियंता तथा कवी अनिल मुळे, संस्थेचे सदस्य अभियंता, उत्तमराव बिराजदार यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोठे योगदान असल्याकारणाने या संस्थेचे व शाळेचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले असून महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षण संस्थेचा पुरस्कार प्राप्त करणारी लातूर, जिल्ह्यातील ही एकमेव संस्था आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
चौकट गुरुजींनी स्त्री शिक्षणाला अनन्य साधारण स्वरूपाचे महत्त्व दिले म्हणून आपल्या धर्मपत्नीला यशवंत बालावाडी आणि नंतर प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली.
माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते ही माणुसकी गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातून आणि कार्यातून दिसून येते.
सुंदर मैत्रीभाव, मनाचा मोठेपणा, व्यापक समज सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या अंगी असल्यामुळे माणसे जोडणे हीच त्यांनी आपली संपत्ती मांनली आहे. या वर्षातही ते नियमित प्राणायाम, ध्यान, योग, वाचन, चिंतन मनन करतात हे विशेष होय.

राम तत्तापुरे,
पर्यवेक्षक,
यशवंत विद्यालय, अहमदपूर
तथा महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसवेश्वर समता शिवा पुरस्कार विजेते, अहमदपूर तालुका
अहमदपूर जिल्हा लातूर