जीवन जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला कर्म करावंच लागतं!
मानव असो किंवा मानवेतर प्राणी असोत.कर्म केल्याशिवाय जीवन जगणं अशक्य होतं.कर्मसिद्धांतानुसार कर्माचे अनेक प्रकार सांगितले आहेत.मानवेतर प्राणीही कर्म करतात पण ते त्यांच्या उपजत बुद्धीने करतात त्यांना तेवढंच कर्म माहिती असतं
दुसऱ्या प्राण्याला उपयोगी पडेल असं परोपकारी काम त्यांना माहिती नसतं.
मानव प्राणीही काही कामे उपजत बुद्धीने करतो.पण बुद्धीच्या
जोरावर,स्वार्थ बुद्धीने अनेकोअनेक कामे सहज शक्य झाले.
माणूस जीवन जगण्यासाठी,स्वसंरक्षणासाठी,संतती संवर्धन या अनुषंगाने मानवाच्या ज्या तीन प्रमुख गरजा अन्न,वस्त्र,निवारा सुरक्षा अशा गरजा प्राथमिक स्वरूपात भागवून जीवन जगत असे.पण जशी प्रगती,विकास,अशी गोंडस नावे उदयास आली
मग त्याअनुषंगाने विविध संस्था निर्माण झाल्या त्यामध्ये प्रमूख शासन संस्था होय.शासन संस्थेच्या अखत्यारीत अनेक संस्था ज्या मानवी प्रगती,विकासाच्या मुद्यावर कार्य करू लागल्या.मग या विविध संस्थां मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम वितरण करण्यात आले.मानवी जीवन अधिकाधिक सुखद,आरामदायी आरोग्यसंपन्न तसेच मौजमजेचे करण्यासाठी गरजा वाढल्या म्हणून मानवाने बुद्धीच्या जोरावर अनेक क्षेत्रांत भौतिक प्रगती केली.पुरातन काळापासून काम करण्याची जी पद्धत आहे त्या अनुषंगाने अनेक प्रश्न समस्या निर्माण होत असत आणि मग सर्वांना भगवद्गीतेतील कर्म सिद्धांत काय आहे? याची आठवण होऊ लागली.समस्या निराकरण होऊ लागले
कर्म सिद्धांताचा विचार करताना भगवान श्रीकृष्णांनी कर्माचे प्रकार विहित कर्म,अकर्म विकर्म असे सांगितले आहेत. तसे
आणखीही काही प्रकार निषिद्ध कर्मे काम्य कर्म,निष्काम कर्म, नित्य कर्म,नैमित्तिक कर्म असे आहेत.जास्ती खोलात न जाता जीवन जगण्यासाठी करावयाच्या नित्य कर्म,विहित कर्माचा, निष्काम कर्माचा आपण विचार करू.
मानवनिर्मित व्यवस्थेमध्ये काम करत असताना नैतिकतेचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.आपलं जे विहित कर्म आहे ज्याचा आपण मोबदला घेतो ते कर्म निष्काम कर्म होऊच शकत नाही.कोणाला उपकारही होऊ शकत नाही ते आपलं कर्तव्य आहे मग आजिबात मोबदला न घेता काम करणं मानवाला शक्य नाही.कारण चरितार्थासाठी मोबदला घ्यावाच लागतो पण आपलं जे विहित कर्म आहे तेच कर्म नैतिकतेच्या अत्युच्च मानसिकतेने जर पार पाडलं तर,(work done by a man as a machine is general, work done by a man as a man by inner mind is moral,and work done by man with high sense of morality is accountable )समर्पित वृत्तीने कर्तव्य बुद्धीनं ठरलेल्या पेक्षा काही जास्त काम केलं तर कांही अंशी का होईना त्या कर्मात निष्कामतेचा शिरकाव होऊ
शकतो.
उदा.आपण आपल्या घरी दुधाचा रतीब लावतो.ऐंशी नवव्द रूपये जो काही भाव असेल त्याप्रमाणे!दुधवाला दररोज एक लीटरच्या मापाने आपल्याला दुध देतो.परंतू गृहिणीचं लक्ष लीटरचं माप घालताना नसतं.माप घातल्यावर वरून काही तो दूधवाला दुधाची धार घालतो का?या वरच्या धारेवर गृहिणीचं लक्ष असतं.माप भरून तर देणं दुधवाल्याचं कर्तव्यच आहे.त्याचा मोबदला तो घेतो पण वरची धार घालतो का?तसं विहित कर्म करणं आपलं कर्तव्य आहे.पण कर्तव्यापेक्षा जास्तीची करणारे, वरची धार घालणारे निष्काम कर्म करणारे कौतुकास पात्र ठरतात. सदैव स्मरणात राहतात.
हल्ली असं झालंय,दूधही भेसळयुक्तच म्हणजे काम करणारा अक्कलशुन्य तर आहेच!बरं असू द्या आपण तो स्वीकारला आहे. पण मापात सुद्धा पाप आहे.दुधाचं मापच बुड ठोकलेलं आहे.मग वरच्या धारेची काय अपेक्षा करावी.विहित कर्माचा मोबदला घेऊन सुद्धा तसूभरही काम न करणाऱ्यांकडून वरच्या धारेची अपेक्षा काय करणार.
एका शासनमान्य अनुदानित एन.जी.ओ.च्या कार्यालयात जाण्याचा योग आला.कार्यालय अगदी टापटीप! प्रशस्त हॉल स्वतंत्र केबिन महागडं फर्निचर!केबिन वर नामफलक कार्यालय प्रमूख,वरिष्ठ लिपीक/अधीक्षक(आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त),विभाग प्रमुख वगैरे वगैरे!दारात सेवक मात्र हजर,तोंडात तंबाकूचा तोबरा,मी त्याला विचारले कार्यालय कधी चालू होतंय?
तो म्हणाला चालूच हाय की! इथं तर कोणी दिसत नाही!
मग म्हणाला हिथं कधीच कोणी नसतंय! लिपीक/अधीक्षक?
ते अध्यक्षाचे जावाई आहेत.फक्त मस्टरवर सह्या करायला येत्यात! अन् पगार? पगार बॅंकेत!कार्यालय प्रमुख,विभाग प्रमुख?घरूनच मोबाईल ग्रुपवर कर्मचाऱ्यांना कामं सांगत्यात!
अन् सह्या आम्ही घरी जाऊन आणतो.अन् त्यांची कामं?मी म्हणालो.कोण तर दुसरे करत्यात,अन् राह्यलं तर त्यांना कोण विचारतोय?अन् खरं सांगू का सायेब त्यांना काहीच येत नाही ते फक्त सह्याजीराव हैती!ही बघा दुधातील भेसळ अन्
मापात पाप!
यावरून एक गोष्ट आठवली.एक पोपट विक्रेता तीन चार पोपट वेगवेगळ्या पिंजऱ्यात घेऊन बसला होता.पोपट सारखेच होते पण प्रत्येकाचा दर मात्र वेगवेगळा होता.एकाचा पाचशे रुपये, दुसरा हजार रुपये,तिसरा दोन हजार असे आणि चौथ्या पोपटाचा दर मात्र चार हजार!ग्राहक येऊन विचारू लागले बाबारे किंमतीत असा फरक का? वाल्याने उत्तर दिले तो म्हणाला पहिला पोपट झाडू मारतो पाणी भरतो,दुसरा पोपट कम्प्युटरवर वर्ड, एक्सेल मध्ये सर्व कामे प्रोग्रामिंग करतो,तिसरा पोपट सॉफ्टवेअर तयार करतो,नवीन एप तयार करतो.
चौथ्या पोपटाची किंमत एवढी जास्त का?तो काय काय करतो?
पोपटवाला म्हणाला,”त्याला काम करताना कुणी पाहिलं नाही.
त्याला काय येतंय हेही कुणाला माहीत नाही.पण हे तिघे जण त्याला साहेब म्हणतात.
यावरून बोध समजून घ्यावा,जिथं दूधच पाणीदार आणि मापात पाप असेल तर वरची धार कशी पडेल ,अन् कोण देत असेल
काय अपेक्षा करावी.
