लातूर पोलिसांची मोठी कारवाई : हातभट्टी आणि अवैध दारू अड्ड्यांवर धाड

0
122


लातूर, दि. २ ऑक्टोबर : लातूर जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ६३ आरोपींवर ६२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २ लाख ९६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही मोहीम दिनांक ३० सप्टेंबर रोजी पहाटे अचानक मासरेडच्या स्वरूपात हाती घेण्यात आली. यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम भागांमध्ये लपून-छपून हातभट्टी तयार करणारे, साठवणूक करणारे व देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री करणाऱ्यांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली. यावेळी हातभट्टी दारू व ती तयार करण्यासाठी लागणारे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले.

या कारवाईत ३६ पोलीस अधिकारी व १६१ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.

पोलिसांनी सांगितले की, अवैध दारूधंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here