लातूर, दि. २२ ऑक्टोबर : लातूर शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तीन मोटारसायकल चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या तक्रारी वाढल्याने पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे २१ ऑक्टोबर रोजी भांबरी चौक, रिंगरोड परिसरात सापळा रचला. या वेळी चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी येणारे तीन संशयित इसम पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी असे आहेत कृष्णा जगन्नाथ भोसले (वय २८, रा. पाखरसांगवी), जितीन सहदेव गायकवाड (वय १९, रा. काळमाथा, ता. औसा), सौरभ सुभाष भोळे (वय १९, रा. सोना नगर, लातूर)
तपासादरम्यान त्यांनी होंडा सीबी शाईन आणि हिरो होंडा पॅशन प्रो या दोन मोटारसायकली बार्शी रोड परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची एकूण किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये इतकी आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आपल्या वाहनांवर सुरक्षा साधने बसवण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.
सदर आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७०/२०२५ व ७७१/२०२५ कलम ३३१(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, सफौ सर्जेराव जगताप, अंमलदार अर्जुन रजपूत, युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख व गोविंद भोसले यांनी केली.




