लातूर : लातूर स्थानिक गुन्हे शाखेने एल.आय.सी कॉलनी परिसरात धडक कारवाई करत ७ लाख ९९ हजार ९०० रुपये किमतीचे ७८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आणि एक गावठी पिस्टल जप्त केले आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलीस अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई करत आहेत. याच मोहिमेंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एल.आय.सी कॉलनी येथील एका घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान, गणेश अर्जुन शेंडगे (वय २६, रा. एल.आय.सी कॉलनी, लातूर) आणि रणजीत तुकाराम जाधव (वय २४, रा. दहिसर केकतीपाडा, गुणुबुवा कंपाऊंड, गोदावरी राणीचाळ, दहिसर पूर्व, मुंबई) हे एमडी ड्रग्जची अवैध विक्री करताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून ७८.७८ ग्रॅम वजनाचे, ३,९३,९०० रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज, गुन्ह्यात वापरलेले विविध कंपन्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ९९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, या छाप्यात एक गावठी पिस्टल देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. या तिघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गणेश शेंडगे आणि रणजीत जाधव यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला तिसरा आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या कारवाईमुळे लातूर शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसला आहे. फरार आरोपीचा शोध आणि यामागे असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, माधव बिलापट्टे, तुराब पठाण, मनोज खोसे, गोविंद भोसले, नवनाथ हासबे, नाना भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, महादेव शिंदे, बंडू नीटुरे, सचिन मुंडे यांनी केली.
