रेणापूरच्या लेकीची उत्तुंग भरारी – आयटीआय परीक्षेत भारतातून मिळविला द्वितीय क्रमांक

0
115

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार

रेणापूर : प्रतिनिधी, रेणापूरची कन्या मदिया खदीर सय्यद हिने आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर अखिल भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) परीक्षेत देशातून द्वितीय क्रमांक मिळवून रेणापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

जुलै २०२५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत मदियाने १२०० पैकी तब्बल ११९२ गुण मिळवत ९९.६६% गुणांसह देशभरातून दुसरे स्थान पटकावले. या ऐतिहासिक यशाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे विद्याभवन येथे तिचा सत्कार करण्यात आला.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मजुर कुटुंबातील ही लेक गरीब परिस्थिती असूनही शिक्षणाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेत आहे. तिचे वडील खदीर सय्यद बांधकाम मजूर असून आई गृहिणी आहे. प्रसंगी पोटाला पिळ देत पालकांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्या जिद्दीच्या बळावर मदियाने हे अपूर्व यश मिळवले.

मदियाच्या यशात तिच्या आई-वडिलांसोबत रेणापूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे सर्वजण मान्य करत आहेत. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वडिलांचे उद्गार
“घरात कुठलीही शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे मला शिकता आले नाही. पण माझ्या पाच मुलींनी जरूर शिकावे, हीच जिद्द होती. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मुलगी हुशार असूनही तिला लातुरला ठेवण्याची आमची ऐपत नव्हती. पण रेणापुरच्या आयटीआयत इलेक्ट्रिशियन ट्रेडला तिला प्रवेश मिळाला. तिने मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आणि देशातून दुसरा नंबर मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
– खदीर सय्यद, वडील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here