लातूर :- श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूरला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत बीएस्सी. बी. एड. आणि बी. ए. बी. एड. या दोन नवीन पदवी अभ्यासक्रमाला नुकतीच मान्यता मिळाली आहे.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य, बीसीए, एमसीव्हीसी, बहिस्थ शिक्षण केंद्र, पदव्युत्तर विभाग आणि संशोधन केंद्र हे कनिष्ठ, वरिष्ठ आणि पद्युत्तर विभागामध्ये चालते. या अभ्यासक्रमासोबत आता नव्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत बीएस्सी. बी. एड. आणि बी. ए. बी. एड. या दोन पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे म्हणून संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, सहसचिव सुनील मिटकरी, संचालक बस्वराज (राजू) येरटे, संचालक राजेश्वर बुके आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमध्ये लवकरच या दोन नवीन पदवी अभ्यासक्रमासोबत एम. एस. डब्ल्यू. हा पदव्युत्तर समाजकार्य अभ्यासक्रमसुद्धा लवकरच सुरू केला जाईल. या अभ्यासक्रमाला तज्ञ प्राध्यापक आणि इतर सर्व शैक्षणिक सोयी सुविधा पुरविल्या जातील त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये या नवीन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी सर्व सन्माननीय संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, संचालक ललिताताई पांढरे, प्रा. जी. एम. धाराशीवे आणि इतर सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
