लातूर : महात्मा गांधीजी विषयी मनात असलेले गैरसमजाचे मळप दूर करून गांधीजींच्या शाश्वत विचारांची आणि कार्याची तरुणांनी कास धरली पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक तथा इतिहास तज्ज्ञ विवेक सौताडेकर यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात IQAC, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग, युवती मंच व नारी प्रबोधन मंच, लातूर यांच्यावतीने महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विस्तार व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. वनिता पाटील ह्या होत्या. तर विचारपीठावर नारी प्रबोधन मंचाचे अध्यक्षा श्रीमती सुमती जगताप, सचिव प्राचार्य डॉ. कुसुमताई मोरे, युवती मंच प्रमुख डॉ. शितल येरुळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. किसनाथ कुडके, कला शाखा समन्वयक प्रा. रवींद्र सोनोने, प्रा. विश्वनाथ स्वामी, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. वैशाली जयशेट्टी, प्रा. शैलेश कानडे, डॉ. बी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना सौताडेकर म्हणाले की, महात्मा गांधी हे एक विश्ववंदनीय नेते आहेत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. महात्मा गांधीजींचे ग्राम स्वराज्य विषयक चिंतन, सत्य-अहिंसा, सविनय कायदेभंग, असहकार यातून भारतीय स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे. त्यांच्याविषयी तरुण पिढीत समज-गैरसमज पसरवले जातात. हेतू पुरसर काही लोक महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सरदार वल्लभाई पटेल या व इतर राष्ट्रीय नेतृत्वाविषयी प्रत्यक्ष वस्तूस्थिती न मांडता लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात येतात. बदलत्या काळातही गांधी विचार हा प्रेरणादायी असून त्याचा अंगीकार तरुण पिढीने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी सुमती जगताप म्हणाल्या की, गांधीजींच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून गांधी विचारांची प्रासंगिकता सांगितली.
यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. कुसुमताई मोरे यांनी नारी प्रबोधन मंचाचे कार्यक्रम, उद्दिष्टे आणि स्वरूप विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रा. वनिता पाटील यांनी गांधी विचार हा विश्वव्यापी विचार असून येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी प्रेरणादायी असा विचार आहे, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शीतल येरूळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अश्विनी रोडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. रत्नाकर बेडगे यांनी मानले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रमेश राठोड, आनंद खोपे, राजू बोडके यांनी परिश्रम घेतले.
