लातूर : गेल्या काही वर्षांत मराठवाड्याचा तब्बल २ लाख ३५ हजार कोटींचा अनुशेष वाढला असून, याकडे राज्यकर्त्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत आणि या प्रदेशावर सातत्याने अन्याय होत असल्याची तीव्र खंत विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी व्यक्त केली आहे.
अनुशेष वाढतच असल्याने मराठवाड्याचे मागासलेपण अधिक ठळकपणे जाणवत आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले. यासाठी मराठवाड्यातील १४ लोकसभा खासदारांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
याचाच भाग म्हणून येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीस मराठवाड्यातील सर्व खासदारांनी उपस्थित राहावे, अशी विनंती शिष्टमंडळाने खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यामार्फत केली.
या प्रसंगी मोईजभाई शेख, नामदेव पाटील, वंगे, नुसरत कादरी यांच्यासह अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने मराठवाड्याच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास अनुशेषाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.


