शिरूर ताजबंद : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठी विभाग प्रमुख तथा ग्रामीण साहित्यिक आणि समीक्षक प्रा. डॉ. उन्मेष शेकडे यांनी “भास्कर चंदनशिव यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनाला मराठी कथेच्या केंद्रस्थानी आणले” असे मत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या भास्कर चंदनशिव यांच्या लेखनात दुष्काळग्रस्त मराठवाड्याचे वास्तव, शेतीचे प्रश्न, मातीचे ओढ आणि मानवी नात्यांचे पदर प्रभावीपणे प्रतिबिंबित झाले आहेत. ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमती’, ‘नवी वारूळ’ हे त्यांचे कथासंग्रह मराठी कथासाहित्यातील वैभव असून, सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांना ते आजही भुरळ घालतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य मन:पूर्वक अभ्यासावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रा. विलास कांबळे, प्रा. डॉ. गोविंद काळे, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि मराठी वाङ्मय मंडळाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी केले.




