पैशाची बॅग चोरीचा बनाव; दोन आरोपी अटकेत,९ लाख ५० हजार रुपये जप्त

0
171

लातूर, शहर प्रतिनिधी : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पैशांची बॅग चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत केला असून, फिर्यादीनेच आपल्या साथीदारांसोबत कट रचून पैसे हडप करण्याचा बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून नऊ लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रत्नदीप सुभाष सोनकांबळे (रा. मीननगर, उमरगा, जि. धाराशिव) याने ११ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती की, अज्ञात व्यक्तीने त्याची पैशांची बॅग हिसकावून नेली. यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली.दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे (रा. बलसुर, ता. उमरगा, जि. धाराशिव) याला दयानंद कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कबुली दिली की, हा गुन्हा प्रत्यक्षात चोरी नसून फिर्यादीच्याच कटाचा भाग होता. चौकशीत पुढे उघड झाले की, फिर्यादी रत्नदीप सोनकांबळे याला त्याच्या मुंबईस्थित मित्राने मोठी रक्कम पाठवली होती. ती रक्कम बेकायदेशीररीत्या हडप करण्यासाठी त्याने आपल्या साथीदारांसह चोरीचा बनाव रचला.फिर्यादी व अल्ताफ यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पैशांची बॅग एका हॉटेलमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी छापा टाकून तेथून ९ लाख ५० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. या प्रकरणात आरोपी रत्नदीप सोनकांबळे व अल्ताफ बडगिरे यांना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी विजय गायकवाड व सुरज कदम (दोघेही रा. लातूर) फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार राजेश कंचे, युवराज गिरी, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, मुन्ना मदने, जमीर शेख, गणेश साठे, वेंकट निटुरे, शैलेश सुडे, हरी पतंगे तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बालाजी कोतवाड, रणजीत शिंदे व काकासाहेब बोचरे यांनी सहभाग नोंदवला.या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, बनावट गुन्हा दाखल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही कायद्यानुसार कठोर शिक्षा होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुन्ह्याचा बनाव रचून कायद्याला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी सावध राहावे, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here