लातूर :- विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे यांच्या वतीने पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या बाराव्या पुण्यस्मरण/ स्मृतिदिनाचे औचित्य साधून, ज्ञान-विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या थोर तपस्विनी कुलीन पंचकन्यांना २४ मे २०२५ शनिवार रोजी लातूर तालुक्यातील मौजे विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर येथे ‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती माईर्स एमआयटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड आणि विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे आणि लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांनी दिली.
या समारंभासाठी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्वज्ञ व चिंतक तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील. बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच, माईर्स एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे ही उपस्थित राहणार आहेत.
या पंचकन्यांमध्ये आळंदी येथील श्रीमती रमाबाई किसन महाराज साखरे, बडोदा येथील बडोदा संस्थानच्या महाराणी सौ. आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड, ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती भारती ठाकूर, राजस्थान येथील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस अँड वेलबिईंगच्या राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन आणि बद्रिनाथ धाम येथील माणा गावाच्या शिक्षिका व समाजसेविका श्रीमती दमयंती जितवान यांचा समावेश आहे.
या पंचकन्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, स्मृतिपदक व रोख रु. १ लक्ष २५ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार २४ मे २०२५ रोजी, सकाळी १० वाजता विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई), लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे. तेव्हा या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व स्थरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आव्हान लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशअप्पा कराड आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
…………
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड
समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ विजेत्यांचा अल्पपरिचय
महाराणी सौ. आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड :- राजघराण्यातील एक संवेदनशील, तेजस्वी व कुलीन कन्या महाराणी सौ. आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड या बडोदा संस्थानच्या महाराणी आहेत. अत्यंत समर्पित भावनेने, श्रद्धेने, निष्ठेने व खर्या अर्थाने भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानानुसार वंचितांना शिक्षित करण्यासाठी, त्यांना अन्न देण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी त्या सतत आंतरिक प्रयत्न करीत असतात. वंचितांचे उत्थान आणि सक्षमीकरण करणे हे त्यांनी जीवनाचे ध्येय बनविले आहे.
श्रीमती भारती ठाकूर :- समर्पित जीवनाचे मूर्तिमंत प्रतिक व ज्येष्ठ समाजसेविका भारतीय ठाकूर या मध्यप्रदेश मधील खरगोन येथे लेपा पुनर्वसन, कसरावदची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी दहशतवादी कारवाया असलेल्या उल्फा येथे असम येथे चहाच्या बागांमधील कामगार आणि आदिवासी मुलांसाठी एक प्राथमिक शाळा स्थापना करून शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. ज्या मुलांनी शाळा सोडली अशा बालकांसाठी अनौपचारिक शिक्षण देत आहेत. तसेच गरीबांसाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे. नर्मदेच्या काठावरील पाच गावांमध्ये नर्मदालयाच्या माध्यमातून ५५० शाळा उघडण्यात आल्या आहेत. अनाथ मुलांसाठी शिक्षण केंद्रे, शिक्षण सुरू ठेवू इच्छिणार्या मुलांसाठी मोफत वसतिगृहांची सुरूवात, मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण बस सुरू करणे, कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.
श्रीमती रमाबाई किसन महाराज साखरे :- भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतिक वै. ह.भ.प. किसन महाराज साखरे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. संपूर्ण जीवनभर त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून आणि ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हे परमध्येय ठेऊन, अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले आहे. या आजही जनतेची अव्याहतपणे सेवा करीत आहेत.
राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन :- या ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर पीस अँड वेल बीइंग पीस अॅम्बेसेडरच्या संस्थापक आहेत. त्या शांती राजदूत म्हणून ओळखल्या जातात. एक प्रबुद्ध आध्यात्मिक व्यक्ती, प्रशिक्षक, लेखक, व्यवस्थापन सल्लागार म्हणून त्या परिचित आहेत.अध्यात्म आणि वैश्विक मूल्ये या विषयात डॉक्टरेट मिळविली असून त्या महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करीत आहेत. ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हे जीवनाचे परमध्येय ठेवले आहे. त्यासाठी त्या अहोरात्र कार्य करीत आहेत. त्या सैन दलाचे अधिकारी, कुटुंबे आणि महिला कल्याण गटांसाठी विविध ताण व्यवस्थापन विषयांवर सत्र आयोजित करतात.
श्रीमती दमयंती देवी जितवान :- या कला शाखेतील पदव्युत्तर असून त्यां विद्याभारती संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बद्रिनाथ येथील माणा गावातील नागरिकांसाठी हातमाग डिझाइनची कला शिकवली त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवून दिला. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहे. तसेच कार्पेट डिझाइनमध्ये तज्ज्ञ आहेत.
