“पुरुषांनी घरातील जबाबदारी घ्यावी, म्हणजे महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढेल” — रुकसाना मुल्ला

0
137

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातूरची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

लातूर, दि. १२ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा शाखा लातूर व शहर शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीला राज्य निरीक्षक म्हणून समितीच्या राज्य प्रधानसचिव रुकसाना मुल्ला उपस्थित होत्या.

या वेळी त्या म्हणाल्या की, “संघटनेचे उद्दिष्ट निर्भीड, विवेकशील, शोषणमुक्त व नीतिमान समाजाची निर्मिती करणे हे आहे. संघटनेची बांधणी मजबूत झाली तर समाज व्यवस्थाही सुस्थितीत येईल. त्यासाठी महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे. पुरुष कार्यकर्त्यांनी घरातील जबाबदाऱ्या सांभाळून महिलांना समाजकार्याची संधी द्यावी. ‘नारी के बिना हर बदलाव अधूरा है’ हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.

संघटना बांधणी संदर्भात बोलताना त्यांनी शाखा बैठका नियमित घेण्याचे, पत्रिकेचे वर्गणीदार वाढवण्याचे, सभासद नोंदणी करण्याचे, नवीन शाखा व कार्यकर्ते निर्माण करण्याचे मार्गदर्शन केले.

राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार यांनी नुकत्याच शहाड (जि. ठाणे) येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा अहवाल सादर केला. पुढील चार महिन्यांतील संघटनात्मक नियोजनाची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य निमंत्रक अ. भ. प. हरिदास तम्मेवार होते. विचारपीठावर जिल्हा उपाध्यक्ष सुनीता आरळीकर, अजित निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे, जिल्हा प्रधानसचिव सुधीर भोसले, राज्य सहकार्यवाह बाबा हलकुडे, मिश्र विवाह विभागाचे राज्य कार्यवाह रणजीत आचार्य, तसेच राज्य निमंत्रित सदस्य दिलीप आरळीकर उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात दिवंगत साथी वैजनाथ कोरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. प्रास्ताविक प्रा. डॉ. दशरथ भिसे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. हनुमंत मुंडे यांनी केले, तर आभार रणजीत आचार्य यांनी मानले. विविध शाखांच्या कार्याध्यक्ष व प्रधानसचिवांनी आपापले अहवाल सादर केले.

अध्यक्षीय समारोपात अ. भ. प. तम्मेवार यांनी संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाविद्यालयाने हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांचे आभार मानले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here