27.4 C
New York
Saturday, July 5, 2025

पाणी टंचाई निवारण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर, दि. 23 : जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत दिल्या. तसेच सर्व तालुक्यातील पाणी टंचाईच्या सद्यस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.

प्रभारी अपर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेवून शहरी भागासोबतच गाव, वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी, विंधन विहारींचे अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, नवीन विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी विविध बाबींचा समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तसेच या विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी उपाययोजना जलद गतीने राबविण्यासाठी या उपाययोजना मंजुरीचे अधिकार उपविभागीय महसूल अधिकारी यांना प्रदान केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कोणत्याही गाव, वाडी-वस्तीवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्यादृष्टीने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेवून सध्या शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील जिवंत आणि मृत पाणीसाठ्यातून शहराला सप्टेंबर 2024 पर्यंत पाणी पुरवठा केला जावू शकतो. तसेच जिल्ह्यातील पशुधनाला जूनअखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा आहे पाणी टंचाई कृती आराखडा

जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर 2023 ते जून 2024 या कालावधीकरिता 2 हजार 420 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या, यासाठी 43 कोटी 76 लाख 49 हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थिती जिल्ह्यात औसा, अहमदपूर, जळकोट, लातूर, रेणापूर आणि उदगीर तालुक्यातील एकूण 26 गावे आणि 12 वाड्यावर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी 5 शासकीय आणि 30 खासगी टँकर अधिग्रहित करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 335 गावांमधील 395 विहिरी, विंधन विहिरी पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

नळ योजना विशेष दुरुस्ती प्रस्तावांना मान्यता

पाणी टंचाई निवारणार्थ सन 2023-24 मध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती उपाययोजनांच्या 5 कोटी 42 लाख 41 हजार रुपयांच्या 57 प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच तात्पुरती पूरक नळ योजनेच्या 1 कोटी 53 लाख 70 हजार रुपयांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून नवीन विंधन विहिरी घेण्याच्या 63 लाख 29 हजार रुपयांच्या 72 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.

अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धडक कारवाई

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांची पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत 59 विद्युतपंप, 161 स्टार्टर्स, 123 बंडल वायर आदी साहित्य जप्त केले आहे. तसेच 876 वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत.

तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’

पाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहे. तरीही नागरिकांच्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. 02382-220204 हा या वॉर रूमचा संपर्क क्रमांक असून नागरिकांना आपली तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे. या कक्षामार्फत संबंधित विभागाशी समन्वय करून या तक्रारींचा निपटारा केला जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles