लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातच नव्हे तर देशात आपल्या कार्यामुळे गौरविली जाते. कायम मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात एक जिल्हा बँक देशपातळीवर आपली ओळख निर्माण करते ही सोपी गोष्ट नाही. यामागे सक्षम नेतृत्व व त्या नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास कायमपणाने आहे म्हणूनच सातत्याने ही बँक यशाच्या शिखरावर विराजमान आहे.
चुकीच्या नेतृत्वात एखादी संस्था गेल्यास त्याचे काय हाल होतात व त्याचा किती दुरोगामी परिणाम त्या भागातील विकासावर होतो हे इतर जिल्ह्याकडे पाहिल्यास लक्षात येते. त्यामुळे योग्य नेतृत्व व त्याचा विचार लाख मोलाचा असतो. कोणतेही नेतृत्व हे एका दिवसात घडत नसते ते घडण्यासाठी अथक परिश्रम व जीवन समर्पित करण्याची भावना मनात असावी लागते, कोणत्याही मोहापासून दूर राहावे लागते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्यांप्रती त्या नेतृत्वाची बांधिलकी असावी लागते.
सुदैवाने असे नेतृत्व लातूरला लाभले म्हणूनच येथील सहकार क्षेत्र अबाधित राहिले आहे. नेतृत्वाच्या शृंखलेत अलीकडच्या काळात धिरज विलासराव देशमुख यांचे नाव मोठ्या कौतुकाने घेतले जात आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्यातील विकासाची दृष्टी व सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्यातील विचारांची दृष्टी अंगीकारून वाटचाल करत असलेले धिरज देशमुख सर्वांना आपलेसे वाटतात.
त्यांचा स्वभाव, वागणे, बोलणे व काम करण्याची पद्धत प्रभावी ठरली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आज जे काही यश प्राप्त केले आहे त्यामागे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांची प्रचंड मेहनत व नियोजन आहे १९८४ साली १ कोटी ३१ लाख भाग भांडवल होते. तेच आज जवळपास १८४ कोटी एवढे झाले आहे. १९८४ साली १२ कोटी ठेवी होत्या त्याच आज ४३०६ कोटी एवढे झाले आहेत. तेव्हा बँकेचा एकूण व्यवसाय ३० कोटी होता तोच आज ८१३९ कोटी एवढा आहे. ही आकडेवारी जर लक्षपूर्वक पाहिली तर बँकेचे यश किती मोठे आहे हे समजून येते. त्यामुळे एवढी मोठी बँक भविष्यात देखील यशाच्या शिखरावर अग्रेसर ठेवायची असेल तर येथे नेतृत्व देखील तेवढेच सक्षम असायला हवे हे ओळखून सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी धिरज विलासराव देशमुख यांना बँकेत संचालक म्हणून घेतले. संचालक मंडळाने एक मुखाने चेअरमन म्हणून धिरज देशमुख यांची निवड केली.
बँकेचा अध्यक्ष या नात्याने काम करत असताना आर्थिक घडी बिघडणार तर नाही परंतू नवीन काहीतरी करून दाखवायचे या हेतूने धिरज देशमुख यांनी कामाला सुरुवात केली. काही शेतकरी तुतीची लागवड करू इच्छित होते व सोबतच चॉकी सेंटर देखील त्यांना उभे करायचे होते परंतु आर्थिक नियोजना अभावी त्यांना ते शक्य होत नव्हते. अशावेळी त्यांनी आपली अडचण दिलीपरावजी देशमुख व धिरज देशमुख यांना बोलून दाखवली. जो शेतकरी ऊसाचे उत्पन्न घेऊ शकत नाही अशांना तुतीचे पीक फायद्याचे ठरेल हे ओळखून तुती लागवडीसाठी बिनव्याजी कर्ज देण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला व खूप मोठा आधार शेतकऱ्यांना दिला. वाढती महागाई व वाढता उत्पादन खर्च याचा विचार केला तर शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाही असे चित्र निर्माण झाले असताना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची योजना धिरज देशमुख यांनी सुरू केली. महत्त्वाचे म्हणजे हाच निर्णय महाराष्ट्रातील इतर काही जिल्हा बँकांनी घेतला होता त्या निर्णयावर ते ठाम राहू शकले नाहीत मात्र धिरज देशमुख अध्यक्ष असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही योजना कायम पणाने चालू ठेवली. यावरून बँकेच्या नेतृत्वाची दृष्टी व आर्थिक सक्षमता दिसून येते.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते उघडणे गरजेचे होते. यासाठी प्रत्येकी दीड / दोन हजार रुपये खर्च येत होता. महागाईच्या या काळात एवढा खर्च महिलांना परवडणारा नव्हता. ही बाब ओळखून धिरज विलासराव देशमुख यांनी एकही पैसा न घेता शून्य रकमेवर हजारो महिलांचे खाते उघडून दिले. यामुळे खूप मोठी आर्थिक बचत महिलांची झाली.
काही शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुटची लागवड करायची होती, प्रयोग नाविन्यपूर्ण होता, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकाच पिकावर अवलंबण न् ठेवता विविध उत्पन्नाचे स्त्रोत स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून लागवड वाडी या हेतूने धिरज देशमुख यांची त्यांनी भेट घेतली व त्यांना कर्जा संबंधी विनंती केली. तेव्हा जिल्हा बँकेचे वतीने ड्रॅगन फ्रुट साठी कर्ज देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सध्या समाजात बेरोजगारीचा प्रश्न भयंकर बनला आहे. अशावेळी तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा व ऊसतोडी साठी मजूरांची होत असलेली कमतरता पाहून ऊस तोडणी यंत्रास कर्ज देण्याचे धोरण जाहीर करण्यात आले. यासाठी जवळपास १०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले यामुळे शेकडो तरूणांना हक्काच व्यवसाय सुरू करता आला आहे. या योजनेचे महाराष्ट्रात कौतुक करण्यात आलेले आहे.
धिरज विलासराव देशमुख यांनी नेहमीच नित्य नव्याचा ध्यास घेऊन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना दिलासा दिला. जिल्हा बँकेत राष्ट्रीयकृत बँके मध्ये ज्या सुविधा दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहकांना दिल्या जातात. त्याच पद्धतीच्या सुविधा जिल्हा बँकेत सुरू करून बँकेचे आधुनिकीकरण केले. आज घरबसल्या जिल्हा बँकेचा सभासद व ग्राहक मोबाईल द्वारे व्यवहार करत आहे. आर्थिक सुबत्ता कायम ठेवत भविष्याचा वेध घेऊन लातूर जिल्हा बँकेने सर्वांचे हित जोपासले आहे.
सतत काहीतरी नवीन करू पाहणारे व ज्यांच्याकडे उद्याचे विलासराव म्हणून पाहिले जाते असे युवा नेते लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
– अँड प्रमोद जाधव
उपाध्यक्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर
