लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मुंबईपर्यंत पोहोचलेली कारवाई
लातूर, दि. 23 ऑक्टोबर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन लाख रुपये किमतीची हार्ले डेविडसन मोटारसायकल चोरणाऱ्या एका आरोपीसह ताब्यात घेत मुंबई येथील कफ परेड पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
दिनांक 22 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधात कार्यरत असताना, दुपारी सुमारास डीमार्ट परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या महागडी मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने मळवटी रोड परिसरात सापळा रचून कारवाई केली असता, श्रीधर राजेसाहेब माने (रा. कारेपुर, ता. रेणापुर, जि. लातूर) हा व्यक्ती विना नंबर प्लेटची हार्ले डेविडसन X-440 (मॅट ब्लॅक रंग) मोटारसायकल घेऊन उभा असल्याचे आढळले.
सदर मोटारसायकलविषयी चौकशी केली असता, आरोपीने मुंबईतील कुलाबा येथील बी. झेलम बिल्डिंग, नोफरा परिसरातून दोन दिवसांपूर्वी ही मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. पुढील तपासात कफ परेड पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 207/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे सदर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आरोपी श्रीधर माने व त्याच्या ताब्यातील मोटारसायकल कफ परेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली. प्राथमिक चौकशीत आरोपी हा भारतीय सैन्यात गेल्या पंधरा वर्षांपासून 757 TPT ट्रान्सपोर्ट प्लाटूनमध्ये कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, युवराज गिरी, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख आणि तुराब पठाण यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास कफ परेड पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.


