लातूर (प्रतिनिधी) : मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहून ज्येष्ठ नागरिक संघ, क्रीडा संकुल लातूर यांच्या वतीने शेतकरी व पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.
या मदत फेरीत ७५ ते ९० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावर उतरून सक्रिय सहभाग नोंदवला. फेरीतून ₹१,०५,३४७/- इतका निधी गोळा झाला, तसेच संघामार्फत ₹५५,६५३/- इतकी स्वतंत्र मदत देण्यात आली. अशा प्रकारे एकूण ₹१,६१,०००/- (एक लाख एकसष्ट हजार रुपये) इतका निधी पूरग्रस्त व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांनी हा निधी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला. यावेळी संघाचे सहसचिव शहाजी घाडगे, सदस्य प्रकाश निला, रमेश भोयरेकर, विश्वनाथ तोडकर आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाचे लातूरमध्ये सर्वत्र कौतुक होत असून, ज्येष्ठांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याने समाजात प्रेरणादायी संदेश दिला आहे.


