लातूर : चाकूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा शिवारात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चामरगा शिवारातील नुकसानीचीही पाहणी केली. या वेळी तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.


