लातूर, शहर प्रतिनिधी (प्रतिनिधी) – कापड लाईन भागातील प्रसिद्ध चापसी सन्स मेडिकल दुकानात आज पहाटे सहा-सात वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानाजवळ राहणाऱ्या कोंडेकर कुटुंबाला दुकानाच्या वरच्या बाजूने धूर बाहेर येत असल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ दुकान मालक राहुल चापसी यांना फोन करून माहिती दिली. यानंतर राहुल चापसी घटनास्थळी धाव घेऊन पोहोचले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, औषधांचा मोठा साठा जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दल व पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत तपास सुरू केला आहे.




