लातूर – दिव्यांग कलाकरांनी आपल्या अफाट कौशल्याने आणि जिद्दीने कलेच्या सर्व सीमा तोडून अविस्मरणीय नृत्य सादर केले. या दमदार सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शनिवारी शहरातील रूक्मिणी मंगल कार्यालयात झालेल्या पर्पल फेअर-2025 या दिव्यांगांच्या मेळाव्यात जिल्हयातील दिव्यांगांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार यांच्या समन्वयाने राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था, सिकंदराबाद यांच्या सहकार्याने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जि.प. लातूर, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, , व संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) यांच्या वतीने शनिवारी जिल्हयातील दिव्यांगांसाठी पर्पल फेअर-2025 चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन जि.प. चे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले, दिव्यांग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, निपीड चे सल्लागार राजेंद्र , वैद्यकीय उपअधिक्षक उध्दव माने, स्वाधार केंद्राचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राजु गायकवाड यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांनी फीत कापून दिव्यांगांनी तयार केलेल्या विविध वस्तुकलेच्या स्टॉलचे उदघाटन करून त्यांच्या कलेचे कौतुक केले. प्रास्ताविकात राजु गायकवाड यांनी हा पर्पल फेअर प्रतिवर्षी गोवा येथे होत असून पिंपरी चिंचवड नंतर मराठवाड्यात प्रथमच लातूरात येथे होत असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी दिव्यांगाचा 5 टक्के सेस निधी सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी उत्त्म वापर केल्याचे सांगत दिव्यांगांच्या विविध स्टॉलमधील कलेला दाद दिली. प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी लातूर विभागात प्रथमच अंधांसाठी विशेष टंकलेखन, मुकबधिर विद्यार्थ्यांचे स्काऊट गाईड व ढोल पथक राबविल्याचे सांगितले. तर सुरेश पाटील यांनी असा उत्सव जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही व्हावेत तसेच दिव्यांगांच्या साहित्य व वस्तु प्रदर्शनाचे मार्केटींग आवश्यक असल्याचे विशेष नमुद केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी या कार्यक्रमास भेट देवून दिव्यांगांच्या कलागुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्यंकट लामजने, डॉ. मयुरी बिल्लावार यांनी केले. तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे, अण्णासाहेब कदम, बसवराज पैके यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
दिव्यांगांच्या कलेला दाद ………
यावेळी कार्यक्रमात जिल्हयातील 30 दिव्यांग शाळांतील 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यात लेझीम नृत्य, गीत गायन, आदिवासी नृत्य्, समुह नृत्य, हालगी, थीम डान्स, एकल नृत्य इ. प्रकार सादर केले. यासह सर्वसमावेशक क्रीडा स्पर्धा, यशोगाथा, पालक प्रशिक्षण, रोजगार मेळावा, साहित्य व कला प्रदर्शनी, पुस्तक प्रदर्शनी इ. स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आनंद मानकोसकर, गौर शेख, हरीश भाईपुरी या दिव्यांग व्यक्तींचा गौरव करण्यात आला.




