लातूर (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष क्षमता असते. ती क्षमता ओळखून स्पष्ट ध्येय ठरवावे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले.
ते मातृभूमी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उषा कुलकर्णी होत्या.
पुढे बोलताना डॉ. जेवळीकर म्हणाले की, “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी” आणि “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका” हे दोन महान विचार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनतत्त्वज्ञानाचे सार आहेत. अशा दोन थोर व्यक्तींना वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राजमाता जिजाऊ केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार होत्या. अंधार, अन्याय आणि परकीय सत्तेच्या जुलमाच्या काळात त्यांनी शिवरायांना केवळ युद्धकौशल्य नव्हे, तर न्याय, नीतिमत्ता आणि स्वराज्याचे संस्कार दिले. त्यांच्या विचारांतूनच स्वराज्याची संकल्पना आकाराला आली.
स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा संदेश संपूर्ण जगात पोहोचवला. १८९३ मध्ये शिकागो येथील धर्मपरिषदेत “माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो” या शब्दांतून त्यांनी भारताच्या विशाल विचारधारेची ओळख करून दिली. “स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे” हा त्यांचा विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
जिजाऊंनी कर्तृत्वाची शिकवण दिली, तर स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास निर्माण केला. आजच्या युवकांनी या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. जेवळीकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रणजीत मोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. शिवांगी वट्टमवार, प्रा. अन्वेश हिपळगावकर, प्रा. जाई शर्मा, प्रा. दीक्षा स्वामी, प्रा. प्रतीक्षा काकरे, प्रा. मीरा पाटील, प्रा. राहुल जाधव, प्रा. नेहा वाघमारे, ग्रंथपाल उषा सताळकर, जगदिशा ओंकारे, अश्विनी काळे, प्रदीप मादळे, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयूर मुळे, प्रकाश गायकवाड, मुबारक पटेल, अर्चना बिरादार व देवानंद डोंगरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




